पुणे ग्रामीण जिल्ह्यात २७ डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

पुणे दि. १३: पुणे ग्रामीण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी २७ डिसेंबर २०२४ च्या रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ द्रव्य बरोबर नेणे, दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणत्याही इसमाच्या चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाऱ्यांच्या चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

सभ्यता अगर नितिमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, अविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करुन त्याचा जनतेत प्रसार करणे, कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अशा पद्धतीने कलम ३७ (१) व (३) विरुद्ध वर्तन करणे, १९५१ चे कलम ३७ चे पोटकलम (३) अन्वये पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करणे तसेच पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या पूर्वपरवानगी शिवाय सभा घेणे किंवा मिरवणूक काढणे यासदेखील प्रतिबंध करण्यात आला आहे. हा आदेश शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरीष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे व त्याबाबत परवानगी आहे त्यांना लागू होणार नाही.

आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्ती महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *